लोकलट्रेनमध्ये जागेवरून आणि डब्यात चढण्यावरून होणारे वाद हे आता जीवघेणे बनत चालले आहेत. एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीमध्ये काम करणाऱ्या पत्रकाराला डब्यात घुसून न देण्यासाठी त्याला आधी दमदाटी करण्यात आली आणि नंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. सुधीर शुक्ला असं या वार्ताहराचं नाव असून तो मीरारोडहून अंधेरीला येत असताना हा प्रकार घडला आहे. शुक्ला यांनी मारहाण करणाऱ्यांचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला मात्र या गुंडांनी त्याचा मोबाईलही खेचून घेतला. पत्रकारांच्या संघटनांनी या घटनेची निंदा करत मुख्यमंत्र्यांना या प्रकारात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मारकुट्या प्रवाशांना ताबडतोब अटक करण्याचे आदेश दिले आहेत.
कार्यालयात पोहोचण्याची घाई असल्याने सुधीर शुक्ला यांनी खचाखच भरलेल्या गाडीत शिरण्याचा प्रयत्न केला. दारात उभ्या असलेल्या टोळक्याने त्यांना गाडीत शिरण्यास आडकाठी केली. मात्र कार्यालयात वेळेवर पोहचायचच असल्याने त्यांचा विरोध मोडून काढत शुक्ला त्या डब्यात कसेबसे शिरले. यानंतर दारात उभ्या असलेल्या प्रवाशांनी शुक्ला यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि नंतर त्यांना मारहाण केली. गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी शुक्ला यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि संपूर्ण प्रकार जाणून घेतला. त्यांनीही दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय.
livemaharashtra
live maharashtra
