प्रतिनिधी
19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते त्याचप्रमाणे मंठा येथे देखील मोरे पाटील परिवाराच्या वतीने आयोजित शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे मागील 12 वर्षांपासून मोरे पाटील परिवाराच्या वतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येतो त्यात रक्तदान शिबिर व स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.
यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 390 व्या जयंतीनिमित्त मोरे पाटील परिवार व शिवसृष्टी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर, स्नेहभोज तसेच महाराष्ट्रभर शिवचरित्र सांगणाऱ्या किंवा शिवकार्य हाती घेणाऱ्या व्यक्तीला शिवछत्रपती राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार असून पुरस्कार वितरणाचे हे पहिले वर्ष आहे. सेलू जि.परभणी येथील प्रख्यात किर्तन, प्रवचन, शिवचरित्रकार हभप बाळू महाराज गिरगावकर यांना यावर्षीचा शिवछत्रपती राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव प्रा सहदेव मोरे पाटील यांनी यावेळी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव निमित्त आयोजित हा कार्यक्रम म्हणजे शिवरायांची प्रेरणा आणि शिवकार्य जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा छोटासा प्रयत्न आहे, मोरे पाटील परिवाराच्या वतीने शिवरायांप्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न या निमित्ताने स्वखर्चाने दरवर्षी केला जातो अशी माहिती यावेळी मोरे परिवारातील सदस्य डॉ. कल्याण मोरे पाटील यांनी यावेळी दिली.
सकाळी 10 वाजता आयोजित या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर याच्या शुभहस्ते व भाजप युवामोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण, रक्तदान शिबीर व स्नेहभोज कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती यावेळी मोरे पाटील परिवाराच्या वतीने देण्यात आली.
